Friday, 30 October 2020

अश्विन(कोजागिरी) पौर्णिमा विशेष

            अश्विन(कोजागिरी) पौर्णिमेचा इतिहास व महत्त्व

            आज अश्विन पौर्णिमा त्यानिमित्ताने आपणा सर्वांना मंगलमय सदीच्छा.💐💐🙏

            

 
                   👆 वर क्लिक करा आणि video पहा

                     बौद्ध धम्मामध्ये वर्षभरात येणाऱ्या सर्व बारा पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्व आहे,त्यातल्या-त्यात अश्विन पौर्णिमा खऱ्या अर्थाने धम्म प्रचार व प्रसाराची सुरुवात करण्याचा दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण ठरते..

🖋️ तथागतांचा प्रथम उपदेश व त्यानंतर ६० दिवसाच्या आत ६० जणांचा भिक्षुसंघ तयार झाल्यावर तथागतांनी 

      "चरथ भिक्खवे चारीकं,बहुजन हिताय बहुजन सुखाय,लोकानुकंपाय,अत्थाय,हिताय सुखाय देवमनुस्सानं । देसेथ भिक्खवे,धम्मं आदिकल्याणं, मज्झेकल्याणं, परियोसान कल्याणं , सात्थ सब्यञजनं ,केवल परीपुण्णं परिसुद्धं, ब्रम्हचरियं पकासेथ ॥ "

🖋️(मराठी अर्थ : भिक्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी, धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा. प्रारंभी कल्याणपद , मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.)" असा मूलमंत्र दिला,आणि भिक्खु चारही दिशांना बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी बाहेर पडू लागले, चारिका करीत असतांना वर्षा काळात भिक्षूंना अनेक प्रकारच्या लोक निंदेचा त्रास होऊ लागला तसेच अनेक नैसर्गिक समस्या, अडचणी व कारणांमुळे तथागतांनी वर्षावासाची सुरुवात केली.त्यांचा प्रथम वर्षावास आषाढी पौर्णिमेला सुरू झाला व अश्विन पौर्णिमेस समाप्त झाला.

🖋️ सतत तीन महिने म्हणजे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा भिक्खू संघ एका ठिकाणी वास्तव्य करतो, जेंव्हापासून विहारे उपलब्ध झाले आहेत तेंव्हापासून खासकरून विहारात वास्तव्य करण्यात येत आहे..

🖋️अश्विन पौर्णिमेनंतर नैसर्गिकरित्या वर्षाऋतु (पावसाळा) समाप्त होतो व नवीन ऋतूची (हिवाळा) सुरुवात होत असून गुलाबी थंडीचे वातावरण तयार होते, आकाश निरभ्र होऊन रात्रीच्या वेळेस चंद्राची शितल छाया पृथ्वीवर ज्यावेळेस पडते तो क्षण आल्हाददायक असतो, प्रत्येकास हवाहवासा वाटतो, पृथ्वी चंदेरी भासू लागते व रात्रीच्या वेळेसही सर्व काही ठळक दिसू लागते..

🖋️ह्याच अश्विन पौर्णिमेनंतर सर्व भिक्खूसंघ पुन्हा बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी गावोगावी प्रचार-प्रसार करण्याच्या हेतूने बाहेर पडतो,या दिवशी बुद्धाच्या धम्माच्या प्रचार-प्रसाराचे नवे वार्षिक पर्व सुरु होते,म्हणून बौद्ध धम्मात या पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे.

🖋️बौद्ध धम्माच्या ऱ्हासाची कारणे वाचल्या नंतर आपल्या सहज लक्षात येते की, भारतामध्ये बौद्ध धम्म नष्ट करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केले गेले आहे, बौद्ध धम्मातील सर्व सण, मंगल दिन, पौर्णिमा व इतर महत्वाच्या घटना ह्या जाणूनबुजून विषमतावादी वैदिक व्यवस्थेच्या माध्यमातून सातत्याने काऊंटर केल्या गेल्या आहेत.

🖋️अश्विन पौर्णिमेबद्दल बोलायचंच झालं तर बौद्धकाळात हा अश्विन पौर्णिमेचा वर्षावास समाप्तीचा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जात असे, त्यात भिक्खुंना उपासकांडून नवीन चिवर, आवश्यक वस्तू व भोजनदान दिले जात असे,त्याचप्रमाणे सर्वांना खीरदान सुद्धा केली जात असे त्याचे वर्णन जातक कथेत आढळते..

🖋️अश्या महत्वपूर्ण पौर्णिमेचे महत्व नष्ट करण्याच्या हेतूने वैदिक व्यवस्थेकडून काल्पनिक कथा रचण्यात आली आहे.


🖋️गुप्त साम्राज्याचा काळात इ.स.च्या चौथ्या ते सहाव्या शतकात झालेल्या वात्स्यायनाने या दिवसाला कौमुदीजागर असे म्हटले आहे, त्यानंतर हा दिवस कोजागिरी( कोजागरी ) पौर्णिमा म्हणून वैदिक धर्मात करण्यात येवू लागला. त्यांच्या काल्पनिक पौराणिक कथेनुसार या दिवशी लक्ष्मी नावाची देवी घुबड या पक्षाच्या वाहनावरून येते व "को जाग्रती" अर्थात कोण जागे आहे हे बघते,जागे असणाऱ्यांवर प्रसन्न होऊन संपत्ती व धन-धान्याची उधळण करते..

🖋️आश्चर्याची गोष्ट ही आहे की, कोजागरी पौर्णिमा या दिवशी देखिल खीरदान केलं जातं, पण सध्या ती लोक त्याला मसाला दूध म्हणून संबोधितात...

🖋️बौद्ध धम्मात या दिवशी वर्षावास समाप्तीनिमित्त विहारांमध्ये प्रवचन, प्रबोधन, धम्मदान, व्याख्यान, ज्ञानदान यांचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, बौद्ध उपासक-उपासिका उपोसथ व्रत धारण करून अष्ठशीलाचे पालन करतात व सर्वांना खीरदान केले जाते..


🕯️ बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायांचे कर्तव्य आहे की, सत्यता व इतिहास जाणून धम्माचरण करून जिवन प्रवास करावा...

जयभिम ,नमो बुद्धाय🙏🏻

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

प्रत्येक बौद्धाचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे

🖋️डॉ.बाबासाहेब आंबेडकर

(दिनांक २४ नोव्हेंबर१९५६ रोजी सारनाथ)

📚संदर्भ-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे

खंड-१८(भाग-३)१९४६-१९५६.

पृ.क्र.५५९

Wednesday, 21 October 2020

पोलीस हुतात्मा दिन

     21 ऑक्टोबर  पोलीस स्मृती दिन


                          आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

  👮🏻‍♂️केव्हापासून  साजरा करतात हा दिवस :-

                    21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात येते.  जिल्ह्याच्या मुख्यालयात या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन केले जाते. तसेच विविध उपक्रमाचे आयोजनही केले जाते.

👮🏻‍♂️का साजरा केला जातो हा दिवस :-

          21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 जवान गस्त घालत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा जणांना वीरगती प्राप्त झाली होती. या घटनेने देशात दु:खाची लहर पसरली होती. वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

🙏पोलिसांकडून  अभिवादन:-

       आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त  पोलीस दलाच्या वतीने आदरांजली. हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही, अशा शब्दात भारतीय पोलिसांनी अभिवादन केलं आहे.


Thursday, 15 October 2020

डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती तथा वाचन प्रेरणा दिवस

                                'वाचन प्रेरणा दिन' 

   

15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.


                      माजी राष्ट्रपती भारतरत्न,भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होतो, त्याच पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर रोजी शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की, डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्यामध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव. यामुळेच डॉ.कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे, हे त्यांनी सांगितले आहे. डॉ.कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जात आहे. या वाचन प्रेरणा दिनामध्ये अधिकाधिक कार्यालये, बँका, कार्पोरेट कार्यालये यांनीही सहभाग घ्यावा आणि वाचन संस्कृतीला बळकट करावे.


वाचन प्रेरणा दिनामागची नेमकी भूमिका काय  ?

          शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. वाचनामुळे होणारे फायदे, अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो, विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होतो हेच नेमके या उपक्रमातून साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच शाळा महाविद्यालयापर्यंत हा उपक्रम सिमित न ठेवता आपण सर्वांनी वाचले पाहिजे.

'वाचाल तर वाचाल' असे म्हटले जाते. आजच्या 21 व्या शतकातही हे आपल्याला तंतोतंत पटणारे आहे. आजचा शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना टी.व्ही, स्मार्ट फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर  करुन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. हा दिवस त्या दिना पुरता मर्यादीत न राहता नेहमीच पुस्तक, मासिक, साहित्य यांचे वाचन व्हावे ही आपली प्रामाणिक भावना आहे.


                  शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा तयार करणे यासारखे उपक्रम वाचन प्रेरणा दिनानिमित्त हाती घेण्यात येणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने शाळांनी इनोवेटिव्ह फंडामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. वाचन दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तास वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा. तसेच एकमेकांना पुस्तक भेट देणे, आई ने वडिलांना देणे, मुलाने वडिलांना देणे, पत्नी ने पतीला पुस्तक भेट देणे असा उपक्रम साजरा व्हावा जेणेकरुन सर्वांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल. याशिवाय वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही करण्यात यावा. तसेच साहित्यिक, मान्यवर व्यक्तींनी वाचनाचे महत्व सांगणारे ट्विट करावे. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुळातच वाचनसंस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते. म्हणून शाळा आणि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करावे.


               वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करावी, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, प्रत्येक ‍शिक्षकाने ऑक्टोबर अखेरपर्यंत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या किमान एका पुस्तकाचे वाचन करावे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबवला जावा, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्यांला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरूप होतील अशी पुस्तके भेट द्यावीत, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेते व वाचन यांची उदाहरणे देऊन चर्चासत्रे घडवून आणणे, , शाळांनी पुढाकार घेऊन ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, असे विविध उपक्रम आणि याव्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करता येतील.

                    मुळातच विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे यासाठीचे हे पहिले पाऊल आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेऊन मुलांनी आनंदाने वाचन करावे हा यामागचा हेतू आहे. आपण सहज अगदी कोणाला काहीतरी भेटवस्तू देत असतो, ही भेटवस्तू पुस्तक असावे म्हणून पुस्तक भेट योजना आखण्यात आली आहे. व्याख्यान, अभिवाचन, चर्चासत्र, कार्यशाळा, पुस्तक प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, निबंध स्पर्धा, वाचन कट्टा या माध्यमातून वाचन चळवळ उभी करायची आहे. वाचनाने काय साध्य होऊ शकते हे आजच्या मुलांना दाखवून देण्यासाठी हा उपक्रम आहे.  शाळांमध्ये वाचन प्ररेणा किंवा वाचन संस्कृतीशी संबंधित विषयावर व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तर शाळा- महाविद्यालये लेखकांशी त्यांच्या लेखनाविषयी, त्यांच्या कलाकृतीविषयी चर्चा करतील. निबंध स्पर्धा किंवा काव्यवाचन स्पर्धा किंवा अभिवाचन स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना किंवा वाचकांना यानिमित्ताने आपल्या आवडत्या पुस्तकाविषयी बोलता येणार आहे. वाचन कसे करावे, का करावे याबाबतही मार्गदर्शन होणार आहे. पुस्तके ही सतत आपल्या ज्ञानात भर कशी पाडत असतात याबाबतही यावेळी मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन होणार आहे.


                         मुळात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा काही एक दिवसाचा उपक्रम असू शकत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयोग आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मला वाटते. आजचा विद्यार्थी हा मोबाईल गेम, संगणकाच्या आहारी जात आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांला अवांतर वाचनासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाशी जोडून ठेवणे हा या वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाचनसंस्कृतीचा विकास आणि प्रसार आवश्यक असून भाषा विकासासाठीही तितकेच आवश्यक आहे.

                    विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश असून वाचन दिन हा फक्त एका दिनापुरता मर्यादित न राहता वाचनाचा हा उपक्रम निरंतर सुरु राहावा यासाठीचा हा प्रयत्न आहे.


चला तर मग डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करुया... पुस्तकांशी नातं जोडूया.....