अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांक
दीक्षाभूमीवर आल्यामुळे अनुयायांना स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा प्राप्त होते. मनात मैत्री, करुणा आणि बंधूभावाचे भाव जागृत होतात. माणूस डोळस होतो. ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या उजेडात आपले जीवन प्रकाशमान करण्यासाठी येतात. बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या क्रांतीच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना नमन केले जाते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संविधानाच्या माध्यमातून सन्मानाने आणि भेदभावरहित जीवन जगण्याचा अधिकार दिला. तर, धर्मांतराने नागरिकांना आपले जीवन सुखी, आनंदी आणि कल्याणकारी करण्याचा मार्ग दाखविलाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माच्या स्वीकाराची कारणे ३१ मे १९३६ रोजी नायगाव, मुंबई येथील 'अखिल मुंबई इलाखा महार परिषदे'च्या भाषणात आणि 'मुक्ति कोण पथे?' या ग्रंथात स्पष्ट केलेली आहेत. त्यात बाबासाहेब म्हणतात, बौद्ध धम्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूलभूत सिद्धांतांची शिक्षा देतो. बौद्ध धम्मच माणसामाणसातील भेद, शोषण आणि विषमता थांबवू शकतो. बुद्धिप्रामाण्यवादी आणि समतावादी तत्त्वज्ञान असलेल्या बौद्ध धम्माचा पाया नैतिक आचरणावर आहे. बुद्धाची शिकवण लोकशाहीवादी असून बौद्ध धम्म दु:खमुक्तीचा मार्ग आहे. बुद्ध म्हणतात, 'मी मोक्षदाता नसून मार्गदाता आहे'. भारतातील हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली विषमतावादी समाजरचना म्हणजे एका समाजाला गुलाम बनवून त्याच्यावर अत्याचार करायला सांगते. डॉ. आंबेडकरांना ही समाज रचना बदलून बुद्धाच्या तत्त्वज्ञानानुसार सामाजिक पुनर्रचना (Reconstruction of Society) करून नवसमाज निर्माण करावयाचा होता. म्हणूनच त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ या विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. धम्मक्रांतीमुळे धर्मांतरीत बौद्धांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडून आले आहे. धर्मांतरीत बौद्ध समाजाची मागील ६३ वर्षांतील प्रगती कोणाच्याही नजरेस भरण्यासारखी आहे. नेमके हेच हेरून स्मृतिशेष हनुमंतराव उपरे यांनीसुद्धा ओबीसी समाजात मोठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी 'सत्यशोधक ओबीसी परिषद' ही संघटना उभी केली. हनुमंत उपरे काका म्हणतात, 'धर्म ही कपडे बदलण्याएवढी सोपी बाब नाही, तर ही मानसिकता बदल करण्याची प्रक्रिया आहे. म्हणून धर्मांतराकडे चळवळ म्हणून पाहिले पाहिजे.' धर्मांतरामुळे झालेले परिवर्तन एकांगी स्वरूपाचे नाही तर ते सामाजिक, धार्मिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी सर्वच क्षेत्रात आढळून येते. एवढेच नव्हे, तर धर्मांतरीत बौद्ध हे विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठतेने आणि तार्किकपणे विचार करतात, हे मानसिक परिवर्तन विलक्षण स्वरूपाचे आहे.डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या या धम्मक्रांतीमुळे नागपूर शहर हे जगाच्या नकाशावर 'बौद्ध क्रांतिस्थळ' म्हणून झळकले. 'दीक्षाभूमी' या नावाने नागपूरला नवी ओळख प्राप्त झाली. दीक्षाभूमी ही ऊर्जाभूमी आणि प्रेरणाभूमी ठरली. दीक्षाभूमी आज भारतीय जनतेच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक पर्यटनाचे क्षेत्र झाले आहे. दीक्षाभूमीवर कोणत्याही प्रकारचा पारलौकिक, आमिष, कर्मकांड होमहवन इ. निरर्थक बाबींना स्थान नाही. तथागत बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांचे अनुयायी या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. या भूमीवर आल्यामुळे अनुयायांना स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा प्राप्त होते. मनात मैत्री, करुणा आणि बंधूभावाचे भाव जागृत होतात. माणूस डोळस होतो. ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या उजेडात आपले जीवन प्रकाशमान करण्यासाठी येतात. बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या क्रांतीच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना नमन केले जाते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संविधानाच्या माध्यमातून सन्मानाने आणि भेदभावरहित जीवन जगण्याचा अधिकार दिला. तर, धर्मांतराने नागरिकांना आपले जीवन सुखी, आनंदी आणि कल्याणकारी करण्याचा मार्ग दाखविला. डॉ. बाबासाहेब म्हणतात, 'माझे जीवन व जगणे हाच माझा संदेश आहे.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ एक व्यक्ती नव्हे, तर ते एक गतिमान तत्त्वज्ञान, मानवतावादी विचार आहे. या विचारावर, तत्त्वज्ञानावर चालणारे आपल्या जीवनात प्रगती करू शकतात. हा विश्वास त्यांना आहे म्हणूनच त्यांच्यात आमुलाग्र परिवर्तन घडून झाले. धर्मांतरामुळे माणसा-माणसातील जातीची बंधने आणि जातीयत्व शिथिल झाले. परिणामी इतर धर्मातील लोकांवरही त्याचा हळूहळू प्रभाव पडत आहे. अशाप्रकारे डॉ. आंबेडकरांचे धम्मक्रांतीचे चक्र गतिमान होत आहे.