Thursday, 25 June 2020

26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष

                 
                  राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष





                         Watching video👆
           
                      जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांची आज जयंती. अस्पृश्य जातीतील गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून देऊन त्यांच्या हॉटेलातील चहा आवडीने पिणाऱ्या या राजाची जयंती 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरी केली जाते. चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेऊन शाहू असे नाव ठेवले. फ्रेंच शिक्षक सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उदारमतवादी शिक्षणाचे धडे 'धारवाड' ला गिरविले आणि त्यानंतर भारतभर प्रवास केला. २ एप्रिल १८९૪ रोजी जनतेचे कल्याण करण्यासाठी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादिवर विराजमान झाले. पुढील २८ वर्षाच्या राज्य कारभारात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले .
टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या चुलत बहिणी चा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलाशी लावून दिला. मराठा राजघराण्यातील मुलीचा विवाह त्यांनी धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आला. आंतरजातीय विवाहासाठी स्वतःच्या घरून होणारा विरोध त्यांनी धुडकावून लावला. पुढे कोल्हापूर आणि इंदोर संस्थानात मराठा - धनगर आंतरजातीय विवाहाची योजना आखून २५ आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी त्या काळी लावून दिले. मित्रहो, आजही या शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्यास खून केला जातो , वाळीत टाकले जाते. शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नाहीत तर जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक देखील आहेत हे आपण लक्षात घेतले. आजही जातीव्यवस्था टिकून असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्याव लागत आहे ही मोठी दुर्देवाची गोष्ट आहे.

समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला. या कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशा पालकांना १ रुपये दंडाची शिक्षा केली . मागासलेल्या जातींना विकासाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० % आरक्षणाची तरतूद केली. विविध तत्कालीन परिस्थिती मध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती ( उदा.पारधी समाज) चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत होत्या.

सनातनी व्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेऊन त्यांना सत्ता आणि संपत्ती चा अधिकार नाकारला होता त्यामुळे त्यांच्यावर नैराश्यातून अशी कृत्ये करण्याची वेळ आली होती ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारून त्यांना गावकामगाराकडे रोज हजेरी लावण्याचा नियम केला होता . शाहू महाराजांनी ही हजेरी पद्धत रद्द केली आणि या जमातीतील लोकांना संस्थानात नौकऱ्या दिल्या. वणवण भटकणाऱ्या या लोकांना त्यांनी घरे बांधून दिली त्यांच्या पोटा पाण्याची सोय करून दिली त्यामुळे गुन्हेगार असा शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.' गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल मात्र त्यांना प्रेमाने मायेने आपलेसे करून सामाजिक दर्जा मिळवून देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळच '.

१८९९ साली कोल्हापूरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला . कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र लेखले. राजालाच जर अशी वागणूक मिळत असेल तर प्रजेच काय? असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला. वैयक्तीक अपमानाकडे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून बघणारा हा राजा होता. याचा परिणाम म्हणजे महाराजांनी कुलकर्णी - महार वतने रद्द केली . शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या विचाराकडे वळाले . शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शाहू महाराजांनी बहुजनांमध्ये शिक्षण प्रसाराची चळवळ सुरू केली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे काढली. गाव तिथे शाळा काढली.

राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाकडे लक्ष दिले नाही तर उद्योग, कला,व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. १९०६ साली महाराजांनी शाहू स्पिनींग अँड व्हॅविंग मिल ची स्थापना केली , १९१२ ला खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले , शाहूपुरी ही गुळाची बाजार पेठ वसविली , सहकारी कायदा करून सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिले, शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी भोगावती नदीवर जगातील मातीचे पहिले धरण बांधले असा हा सर्वांगीण विकास साधणारा दूरदृष्टी असणारा राजा.

महात्मा फुले यांनी सुरु केलेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ शाहू महाराजांनी पुढे यशस्वी पणे चालू ठेवली. शाहू महाराजांनी पुढे या चळवळी चा वारसा योग्य अशा व्यक्तीकडे सुपूर्द केली त्या व्यक्तीने पुढे देशाची राज्यघटना निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले ती व्यक्ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. १९१९ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा 'खरा पुढारी' मिळाला आहे असे सांगितले.

१९१९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना 'राजर्षी' पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

मित्रहो, शाहू महाराजांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून, शिक्षण प्रसार करून खूप मोठे काम केले पण आपण त्यांचे विचार अंगिकारतो आहोत का? हा आज खरा प्रश्न आहे. त्यांचे विचार महाराष्ट्राला समजले असते तर भीमा कोरेगाव सारख्या जातीय दंगली महाराष्ट्रात घडल्या नसत्या.आंतरजातीय विवाह केल्यास खून झाले नसते. आजही आपण आडनावा वरूनच एकमेकांच्या जातीचा शोध घेतोय हे वास्तव आहे. हुंड्या सारखी महिलांवर अन्याय करणारी प्रथा आपण जोपासतोय. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील रुद्रवाडी मध्ये दलित सवर्ण असा वाद झाल्यामुळे २૪ कुटुंबाना त्यांच गाव सोडाव लागलं. मातंग समाजातील लोकांनी मंदिरात प्रवेश केल्यामुळे त्यांना वाळीत टाकण्यात आलं अशा घटना शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात घडत आहेत. सरकार अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. शाहू महाराजांइतके योगदान आपल्याला देता येणार नाही पण मनामनात रुजलेल्या या जातीच्या भिंती पाडून शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे आचरण आपल्याला नक्की करता येईल.

स्रोत- इंटरनेट व संदर्भ साहित्य


       👆 वरील लिंक ला क्लिक करून शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चाचणी सोडवा


Thursday, 11 June 2020

12 जून बाल कामगार विरोधी दिन

                      
                        बाल कामगार विरोधी दिन



                    बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा... पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते... कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. हेच ते बालकामगार... 12 जून बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं.

14 वर्षांखालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात. एकीकडे बोट ठेवलं ती वस्तू विकत घेऊन देणारी हौशी मॉम-डॅड तर दुसरीकडे कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप... समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार...? हा समाजापुढे गहण प्रश्नच आहे.
           बालकामगाराची प्रथा हा समाजाला लागलेला कलंक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. हा कलंक दूर करुन बालकामगारांचे शिक्षण करणे ही सामाजिक गरज बनली आहे. गरीबीमुळे शाळा न शिकणारी मुले, मुली कामधंदा करुन अर्थार्जन करतात. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग, व्यवसायात कामावर न ठेवता त्यांची शारिरीक व मानसिक वाढ होण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथा निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.

बालकामगार निर्माण होण्यास आईवडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम करतात.

🔷 बालमजूरीमागील कारणे...:-

अंतराष्ट्रीय संस्था युनिसेफ (UNICEF) च्या मते, लहान मुलांचे शोषण करणे सोपे असते म्हणून त्यांना कामावर ठेवण्यात येते. लहान मुले त्यांच्या वयाला अयोग्य अशा ठिकाणी व अशा प्रकारची कामे का करत असतात. यासाठी सामान्यतः त्यांची गरीबी हे पहिले कारण दिले जाते. परंतु यामागे लोकसंख्येचा भडका, स्वस्त मजूर, उपलब्ध असणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी न होणे, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविणे व मीण क्षेत्रांतील प्रचंड गरीबी अशी काही कारणे आहेत.

🔷 भारतात 6 टक्के कामगार आहेत बालमजूर.... :-

📌 आंतरराष्ट्रीय मजूर संघटने’ च्या आकडेवारीनुसार सध्या जगात ५.२ कोटी बालकामगार आहेत. त्यांपैकी २.९ कोटी दक्षिण आशियात असून एक कोटी आफ्रिकेत, ९० लाख पूर्वआशियात आणि ३० लाख लॅटिन अमेरिकेतील देशांत आहेत.
📌 विकसित देशांत बालकामगारांची संख्या दहा लाखांपर्यंत आहे. दक्षिण आशियामधील २.९ कोटी बालकामगारांपैकी १.७ कोटी भारतात आहेत, म्हणजे भारतातील एकूण कामगारांपैकी बालकामगारांची संख्या सहा टक्के आहे.
📌 १९७१ च्या जनगणनेनुसार आंध्र प्रदेशात बालकामगारांचे प्रमाण सर्वाधिक असून ते एकूण लोकसंख्येच्या ९.२४% भरते. तेच प्रमाण केरळमध्ये सर्वांत कमी म्हणजे १.३०% आहे. सर्व देशांत ९३% बालकामगार ग्रामीण भागांत व उरलेले नागरी भागांत आहेत.
📌 ग्रामीण भागांत शेती, गुरे वळणे, छोटे उद्योग आणि नागरी भागांत छोटी दुकाने, उपहारगृहे व कुटुंबात चालविण्यात येणारे छोटे व्यवसाय यात हे बालकामगार अल्पवेतनावर राबताना दिसतात.


🔷 गुरुपदस्वामी कमिटीची स्थापना...:-

सरकारने बालमकामगारांचा आभ्यास करण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी १९७९ मध्ये गुरुपदस्वामी कमिटीची स्थापना केली होती. या कमीटीने जे मुद्दे मांडले, ते सर्वांनाच चकीत करणारे होते. कमीटीने केलेल्या आभ्यासातून असे लक्षात आले की, जो पर्यंत गरिबी पुर्णपणे हटणार नाही, तो पर्यंत बालमजुरी थांबणे अशक्य आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाईचा ऊपाय हा प्रश्न सोडवू शकत नाही. तर, अशा परिस्थितीत मुलांच्या आरोग्यावर परिणाम होईल अशा जागी काम करण्यास बंदी करावी. तसेच, या प्रश्नांवर तोडगा काढण्यसाठी सर्वानी एकत्र यावे, असे कमिटीने म्हटले.

🔷 आरोग्यावर परिणाम होईल अशा जागी काम करण्यास बंदी... :-

       १९८६ साली गुरुपदस्वामी कमिटीने मांडलेल्या मुद्दयांवरुन, बालमजुर (थोपवणे व कमी करणे) कायद्याची स्थापना झाली. या कायद्यांतर्गत कोणत्याही लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होईल अशा जागी काम करण्यास त्यांना बंदी घालण्यात आली व हे थांबवण्यासाठी हयात बदल करण्यात यावे असा निकाल दिला गेला. कोणते काम हे आरोग्याला धोकादायक असेल, याची यादी बालमजुर सल्ला केंद्राच्या वतीने तयार करण्यात आली.

🔷 बालश्रमाचे निर्मूलन करण्यासाठी काय? :-

        बालश्रम निर्मूलनासाठी, राष्ट्रीय बालश्रम प्रकल्प योजनेच्या अंतर्गत 76 बालश्रम प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. याचा फायदा 150,000 मुलांना होणार आहे. 105,000 मुलांना या आधीच विशेष शाळांत दाखल करण्यात आले आहे. कामगार मंत्रालयाने राष्‍ट्रीय बालश्रम प्रकल्प योजना (NCLP) 600 जिल्हयांत राबविण्यासाठी योजना आयोगाकडे सुमारे 1500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. सध्या ही योजना 250 जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ढाबा, घरे येथे तसेच इतर 57 धोकादायक उद्योगांत काम करणाऱ्या मुलांना (9 ते 14 वयोगटातील) ह्या योजनेचा फायदा होणार आहे. समग्र शिक्षा अभियानासारख्या सरकारी योजना देखील राबविल्या जात आहेत.
.
          त्यांनी काम नाही केले तर त्यांचे कुटुंब चालणार नाही अशी परिस्थिती आहे. मात्र, कायद्याप्रमाणे ते चुकीचे आहे. अनेक मुलांपर्यंत योग्य सुविधा पोचल्या, तर बालकामगार म्हणून काम करण्याची वेळ येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 
            बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे.  9 ते 14 वयोगटातील धोकादायक, व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते. या दिनाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.

🔷 बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ :-

वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे . विशेषतः, १४ वर्षाखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो.
त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशा सर्व कारखान्यांवर हा अधिनियम नियंत्रण ठेवतो.

दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या, किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत. मात्र, या अधिनियमाच्या कक्षेमधून कुटुंबे व प्रशिक्षण संस्थांना वगळण्यात आलेले आहे.

नियमभंग करणा-याना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास, व त्यासोबत र १०,००० ते र २०,०००/- दंड होऊ शकतो. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय बालकामगार योजना राबवण्यात आलेली आहे.

 🔷बालपण परत मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे:-

          बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहे. उज्वल भारताच्या भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तरच भारत देश महासत्ता बनू शकतो.

  स्रोत - माहिती संकलन (इंटरनेट)

Wednesday, 10 June 2020

10 जून जागतिक दृष्टीदान दिन

                   
                            जागतिक दृष्टीदान दिन 



                नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.

उद्देश्य:-

जागतिक दृष्टीदान दिनाचे उद्दिष्ट नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे.विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.
मानवी जीवनात दृष्टीला प्रचंड महत्व आहे.त्यामुळे ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ किंवा ‘दृष्टी आड सृष्टी’ ह्या म्हणी तयार झाल्या आहेत.माणूस जगातील सृष्टी सौंदर्य आपल्या चक्षूद्वारे अंतःकरणात साठवून ठेवू शकतो. त्यामुळे डोळ्यांना मानवाच्या पंचेद्रियामध्ये मानाचे स्थानआहे.डोळ्यांचा उपयोग नयनरम्य, मनोहर सृष्टीसौंदर्य टिपण्याबरोबर मनात स्थान निर्माण करून त्यांची छबी मनपटला बरोबर सुंदर चित्राद्वारे इतरांनाही देता येते.
दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळावे यासाठी नेत्रदान किंवा दृष्टीदान प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन मानवास होवू शकेल. अर्थात नेत्रदान मरणोत्तर केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोग अंध व्यक्तीस नक्कीच होईल.
मानवाच्या जीवनात डोळेच फक्त मरणोत्तर अंधाना मदत करू शकतात. तेव्हा दृष्टी दानामुळे एक माणूस दुसऱ्या अंध माणसाचे जीवन प्रकाशमय करू शकतो

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?:-

🔴 चांगल्या दृष्टीक्षेपासाठी निरोगी आहाराचे सेवन करावं: - आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स, आणि गाजराचा समावेश जास्तीत जास्त करावा.
🔴 धूम्रपान सोडावं :- धूम्रपान केल्यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक आणि मज्जातंतूच्या नुकसानासह दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात.
🔴 सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचण्यासाठी यूव्ही सनग्लासेस वापरा: - जे आपल्या डोळ्यांचा संरक्षणासाठी चांगले आहेत.
🔴 सेफ्टी ग्लासेस वापरा :- आपण कार्यस्थळी धोकादायक पदार्थासोबत काम करीत असल्यास आपल्याला आपले डोळ्यांच्या संरक्षणासाठी सेफ्टी ग्लासेस घालणे आवश्यक आहे.
🔴  संगणकावर बऱ्याच काळ काम करीत असल्यास : वारंवार जागेवरून उठा. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
🔴 टीव्ही बघताना किंवा संगणकावर काम करतांना अँटी ग्लेयर चष्माचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
🔴 कमी प्रकाशात वाचू नका : डोळ्यांच्या त्रासांसाठी हे देखील कारणीभूत असतं.
🔴 डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमाने डोळ्यांची तपासणी करा.
🔴 खिडकी किंवा दिव्यांमधून येणार थेट प्रकाश संगणकावर पडू देउ नये. डोळ्यांवर चकाकी पासून वाचण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास अँटी ग्लेयर स्क्रीनचा वापर करा.
🔴 कॉन्टॅक्ट लॅन्सचा वापर करीत असाल तर जास्त काळ घालण्यापासून टाळावं: कॉन्टॅक्ट लॅन्स वापरताना पोहणे आणि झोपणे टाळा.
       असे बरेच कारणे आहेत ज्यामुळे लोकं नेत्रदान करत नाही.

भारतामधील नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खालील कारणांमुळे अत्यंत कमी आहे-

📌 सामान्य लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव
📌  संस्था आणि रुग्णालयात अपूर्ण सुविधा
📌  प्रशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसणे
📌 सामाजिक आणि धार्मिक मान्यता

जगाच्या एक तृतीयांश अंध लोक भारतात...:-

       संपूर्ण जगात ४५ दशलक्ष अंध लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष अंध लोक हे भारतात आहेत. भारतासह जगभरातल्या असंख्य देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते अशी नोंद आहे. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर ऑपरेशन करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.

मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे:-

     नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.

तुम्हीही करू शकता नेत्रदान:-

       नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता.

           ही संकल्पना राबविण्यासाठीचा दिवस म्हणजे दृष्टीदान दिवस होय.प्रत्येक माणसाने नेत्रदानाचा संकल्प केल्यास जगातील मोठ्या प्रमाणात नेत्रहिन व्यक्ती प्रकाशात देवू शकतील.डोळे उघडे ठेवून नेत्रदान संकल्पाचा विचार आणि आचार सामान्य माणसांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे.डोळ्यांमुळे माणसांच्या चेहऱ्यायावरील भाव,स्वभाव, प्रत्येक माणूस सहज ओळखू शकतो.

     त्यामुळेच ‘डोळ्यात वाच माझ्या तू गीतभावनांचे’, ‘डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नका’ इ. डोळ्यांच्या विशेषणांची गाणी झाली.‘डोळे’ माणसाला सौंदर्याबरोबर अनेक गोष्टी शिकवतात. माणसा माणसातील कपड्यांची आवड, त्यांच्या चेहरेपट्टी वरून ओळखला जाणारा स्वभाव, त्यांची पाहण्याची दृष्टी, त्यातून घेतला जाणारा बोध, एकूण डोळे इतर अवयवांपेक्षा अधिक माहिती माणसाला देतात.
त्यामुळे ‘दृष्टीदाना’चे वेगळे महत्व चटकन माणसाला जाणवते.‘दृष्टीहीन’ या सर्व गोष्टींना मुकतो. त्याच्या जीवनांतील अंधार दूर होण्यासाठी किमान प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान संकल्प करावा.त्यामुळे याच देही, याच डोळी, जीवनांत प्रकाश पडेल.

स्रोत:- इंटरनेट

Tuesday, 9 June 2020

9 जुन जननायक बिरसा मुंडा स्मृतिदिन

                 
                              जननायक बिरसा मुंडा




                   बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते.
आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा :-

              बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील अलिहत गावामध्ये एका झोपडीत झाला . त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडीलांचे नाव सुगना मुंडा असे होते .त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.

शिक्षण :-
     
           बिरसा लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते . त्यांचे प्राथमिक शिक्षण सलगा या गावातील त्यांच्या मावशीकडे झाले .पुढे ते मिशनरी शाळेत चाईसाबा येथील जी. सी. एल. मिडल स्कूल मधून त्यांची उच्च माध्यमिक परीक्षा पास केली . बिरासांना येथेच मिशनऱ्यांच्या दुष्ट्चक्रांबद्दलचा पहिला अनुभव आला .
मिशनरी आदिवासींचे शोषण करतात म्हणून त्यांनी मिशनरी शाळा सोडून दिली. आणि त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले .

विवाह :-
           त्यानंतर १८९ ० -१८९४पर्यंत ते बंद्गाव येथेच राहिले ,पुढे त्यांचा विवाह हिराबाई नावाच्या कन्येशी झाला परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला .
बिरसा मुंडा ते भगवान बिरसा :-
        बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य यांची सुद्धा आवड होती .ते उत्तम बासुरी वाजवायचे, त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला .ते रानात गुरे चरायला नेत . त्यामुळे निसर्गात उपलब्ध असलेल्या वनऔषधीबद्दल चांगलेच ज्ञान होते ,ते आजारग्रस्त लोकांना विशिष्ट प्रकारची जडीबुटी देवून त्यांचा आजार बरा करत असत . म्हणूनच लोक त्यांना 'भगवान बिरसा' म्हणू लागले . एकदा पावसाळ्यात कडाडती वीज बिरसांवर पडली. परंतु बिरसांना कसलीही इजा झाली नाही, याउलट त्यांच्या आजूबाजूची झाडे विजेमुळे खाक झाली . या घटनेपासून इंग्रजही आश्चर्यचकित झाले व "बिरसा god है" असे ते मानू लागले,व तसे त्यांनी नमूदही करून ठेवले आहे .

कार्य :-
        सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती . आदिवासी जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते . पण त्याबद्दल चकार शब्दही न काढण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते,परंतु बिरासांना ते सहन झाले नाही बिरासांनी लोकांमध्ये जागृती करण्यास सुरवात केली ,ते लोकांना म्हणत कि "तुमच्या जमिनी धूळ वाऱ्यासारख्या उडून गेल्या आहेत,स्वभिमानासोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे,जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आया बहिणींची अब्रु कशी वाचवाल …… ?"या वाक्यांचा लोकांच्या मनावर खोल परिणाम झाला . व लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होण्यास सुरवात झाली.

उलगुलान  :-
           सन १८६९मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला,त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली . आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्द बिरासांनी १८९०मध्ये व्यापक क्रांती 'उलगुलान 'ची घोषणा केली . शस्त्रबळ तयार करून शत्रूंना ठार केले .
सन १८७५ मध्ये 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच !'हि लोकमान्य टिळकांची घोषणा देशभरात पोचली पण नव्हती ,त्याही आधीपासून बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रजी सत्तेला आवाहन केले होते हे इतिहासातील खूप मोठे सत्य किती जणांना माहित आहे … ?
बिरसांनी १८९५मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले,जंगल,जमीन संपत्ती हा आमचा अधिकार आहे ,ते आमच्या उपजीविकेचे साधन आहे ,यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले . त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले . यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. बिरसांनी अनेक अनुयायी तयार केले. बिरसा व त्यांच्या अनुयायांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिली. हि बातमी पोलिसांनी जिल्हाधिकार्याला कळवताच बिरासांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले . ९ ऑ. १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. आणि ख्रिस्ती पाद्रींच्या साक्षीवरून त्यांना २ वर्ष कारावास व ५० रु. दंड ठोठावण्यात आला.
३० नोव्हे. १८९७ रोजी बिरसा तुरुंगातून बाहेर आले ,त्या वेळी आदिवासी समाजाची केविलवाणी स्थिती बघून ते पेटून उठले व त्यांनी स्वावलंबन व स्वाभिमानासाठी उलगुलान ची घोषणा केली.
बिरसा हे उत्तम योद्धा होते.एक कुशल प्रशासक होते. फेब्रु. १८९८मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी बुरुज या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवला. या हल्ल्यामध्ये त्यांनी पोलिस चौकी लुटायचे ठरवले,नाताळच्या रात्री आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले. फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले.
जाने. १९०० मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकाऱ्यांना बिरासांच्या या हल्ल्याची माहिती मिळाली आणि जाने. १९०० मध्ये ११. वाजता इंग्रजांनी डुंबारी बुरुजावर गोळीबार सुरु केला, तेव्हाच बिरासांचे अनुयायी त्यांच्या नावाचा जयजयकार करत धनुष्यबाण व दगडफेक करत त्यांचा प्रतिकार करण्यास सुरवात केली. त्यावेळी टेकडीवर २०००पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपस्थित होता,यात स्त्रिया व लहान मुलांचाही समावेश होता. या नरसंहारात २००पेक्षा जास्त आदिवासी मारले गेले,व बाकीच्यांना जबरदस्तीने ख्रिश्ती धर्म स्वीकारण्यात भाग पाडले गेले. हा नरसंहार 'डुंबारी बुरुज नरसंहार' म्हणून ओळखला जाऊ लागला.

बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास 500 रूपये बक्षिस जाहीर केले.
      या नंतर ७जाने. १९००मध्ये पोलिसांनी धरपकड सुरु केली, व पुढे ३फेब्रु. १९००मध्ये बिरसांनी आपल्या ८० अनुयायांसमवेत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळेस तेथे उपस्थित आदिवासी बांधवांना बिरासांनी माधारी फिरण्यास व आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला.
त्यानंतर वयाच्या केवळ २५व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना कॉलाराने ग्रस्त होवून बिरासांची प्राणज्योत मालवली. परंतु येथेही इंग्रजांचे कपट दिसून येते,बिरासांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरासांना तुरुंगात कॉलराच्या औषधाऐवजी विष देण्यात आले होते.9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.

बिरासांना खात्री होती कि त्यांनी सुरवात केलेल्या उलगुलान नावाच्या वादळाचा कधीच अंत होणार नाही,बिरसा अमर आहेत व आपल्यासाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहेत .
बिरासंच्या 'उलगुलान' ला हि बिरसाइतकेच महत्व प्राप्त झाले,उलगुलान मध्ये समाजहीत तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे आदि तत्वे समाविष्ट आहेत ,म्हणूनच लोक बिरासांना धरती आबा म्हणून संबोधतात.
आजही या महानव्याक्तीच्या पवित्र स्मृती झारखंड राज्यात आहेत. झारखंड राज्याने रांची airport व रेल्वे स्थानकाला 'बिरसा मुंडा' हे नाव देवून त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे.
या महान आदिवासी वीराला आयुश तर्फे शतशः नमन !जय बिरसा!

✏️ स्रोत :-इंटरनेट 

Monday, 8 June 2020

8 जून जागतिक महासागर दिन विशेष

                   8 जून 
                            जागतिक महासागर दिन


         जागतिक महासागर दिन जगभर ८ जून रोजी पाळला जातो. २००८ सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी १९८२ सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था ; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात.

            जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन,अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते.

महासागर कितीही विशाल असले तरी माणसाने केलेला किती कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर काही मर्यादा आहे. आपण ही मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नसाखळ्यांना धक्का बसला आहे. यामुळे माणसाला मिळणारे मासे तर कमी झाले आहेतच, शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे.

मूळ संकल्पना व सुरुवात :-

समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने, हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला आहे.


पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७१ टक्के भूभाग हा विविध प्रकारच्या जलस्रोतांनी व्यापला आहे आणि त्यापैकी तब्बल ९७ टक्के जलसाठा हा खाडय़ा, समुद्र आणि महासागरांच्या रूपात आहे. ‘द ओशन प्रोजेक्ट’ या १९९७ साली अमेरिकेत स्थापन झालेल्या (आणि आता जागतिक झालेल्या) प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, संग्रहालये यांच्या संघटनेने ‘एकच महासागर’ ही संकल्पना मांडली. परंतु भौगोलिकदृष्टय़ा आणि राजकीयदृष्टय़ाही या ‘एकच महासागरा’ची पाच खंडांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे समुद्र हा खाद्य आणि विपुल प्रमाणात ऑक्सिजन पुरविणारा स्रोत, जैवविविधतेचे महाकाय भांडार, अनेकविध रत्ने, खनिजे, तेल आपल्या उदरात बाळगणारा रत्नाकर.. ही सर्व वर्णने अपुरी पडतील अशा अगणित मार्गानी महासागर मानवासाठी व एकुणातच चराचर सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. तापमान नियंत्रण, निसर्गातील जलचक्राचे नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण हेदेखील सागर घडवून आणतो.

या पार्श्वभूमीवर, सागर-महासागराचे शाश्वत विकास व सागरी परिसंस्थेचे मानवी अस्तित्वासाठी असलेले मोलाचे योगदान पाहता, त्यातील साधन-संपत्तीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जन-जागृती व्हावी या हेतूने दरवर्षी ८ जून रोजी ‘जागतिक महासागर दिन’ साजरा करण्यात येतो. सागराप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचा एक दिवस ठरवावा ही मूळ कल्पना कॅनडा सरकारतर्फे १९९२ साली झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत मांडण्यात आली होती. त्याचा पाठपुरावा करत २००८ साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने या कल्पनेला अधिकृत मान्यता दिली.


यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था, अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधक-अभ्यासक मिळून समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. सर्वानाच सागराबद्दल कुतूहल असते. आज जगभर साजरा होत असलेल्या या महासागर दिनाचे यंदाचे संकल्पसूत्र आहे- ‘शाश्वत महासागरासाठी नवसर्जन’! अर्धी पृथ्वी जरी आपण तिच्या नैसर्गिक स्वरूपात राखू शकलो, तरी तब्बल दहा लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून आपण वाचवू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अभ्यासपूर्ण कयास आहे. त्याआधारे, २०३० सालापर्यंत कमीत कमी ३० टक्के तरी जमीन आणि जलस्रोतांचा भाग संरक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन यंदाच्या महासागर दिनानिमित्त जगभरच्या धोरणकर्त्यांना, राज्यकर्त्यांना करण्यात आले आहे. या मोहिमेबद्दल अधिक माहिती https://worldoceansday.org/about/conservation-action-focus/ या संकेतस्थळावर मिळेल. आजच्या ‘जागतिक महासागर दिना’निमित्त जीवसृष्टीची तारणहार असणारी ही नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवण्यासाठी संघटित प्रयत्नांचा संकल्प करू या.

अधिक माहिती:-

सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या... कचरा कोणताही असो- “फेका समुद्रात !” अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो समुद्र, एवढ्याशा कच-याने काय होतंय? ही प्रथा जगभरातील (व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत) बहुतेक सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत... हे सारे थांबविणे हेच या दिनाचे खरे उद्दिष्टे आहे.


२०२० चे ध्येय

प्लॅस्टिकपासून महासागरांचे रक्षण करणे असे ध्येय २०२० वर्षासाठी संस्थेकडून निश्चित करण्यात आले आहे.

स्त्रोत:- इंटरनेट

Friday, 5 June 2020

५ जून ‘जागतिक पर्यावरण दिन’ विशेष

     
            5 जून
                      World Environment Day
                            जागतिक पर्यावरण दिन
                                                     


                          Watching video👇



                  :दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणं, समस्या, संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं हा यामागचा मुख्य उद्देश होय. पर्यावरणासाठी पुरक निर्णय घेण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

                 1972 मध्ये वातावरणात वाढत्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येसंदर्भात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचा पाया घातला गेला. जागतिक पर्यावरण दिन सर्वप्रथम स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे आयोजित करण्यात आला होता.

              यानंतर, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जूनपासून सुरू झाला. त्याच वेळी, पर्यावरण संरक्षण कायदा 19 नोव्हेंबर 1986 पासून भारतात लागू झाला.

             दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाला एक थीम दिली जाते. जागतिक पर्यावरण दिन 2020 ची थीम 'निसर्ग काळासाठी'
 "Time for nature" आहे. पृथ्वीवरील आणि मानवी विकासास आधार देणारी आवश्यक पायाभूत सुविधा पुरविणे हे त्याचे उद्दीष्ट असले पाहिजे

                  दरवर्षी जगातील देश जागतिक पर्यावरण दिनानिमित्त औपचारिक समारंभ आयोजित करतात. पण यंदाचे यजमान जर्मनीशी भागीदारीत कोलंबिया आहे. यावर्षी कोविड -१९ (साथीचा रोग) सर्व देशभरात उद्रेक झाल्यामुळे कोट्यवधी लोक जागतिक पर्यावरण दिन डिजिटलपणे साजरे करतील. लॉकडाउनने मानवांना हादरा दिला असला तरी, लॉकडाऊनचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.

        माणूस, निसर्ग आणि पर्यावरण यांच्यातील द्वैत मोडून या सगळ्याचा साकल्याने आणि समग्रतेने विचार करण्याची आवश्यकता आहे, पर्यावरणीय असंतूलनामुळे निर्माण झालेल्या समस्यांमधून तोडगा काढण्यासाठी आपल्याला सारासार विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली जीवनशैली संपूर्णपणे बदलावी लागेल,


         जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या जागेवर किंवा निवासस्थानांवर मानवाने आक्रमण केल्यामुळे मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षांला सुरुवात झाली आहे. पर्यावरण म्हणजे केवळ जंगल नव्हे तर पाळीव प्राणी हादेखील पर्यावरणाचा घटक आहे

              शहरी भागांत वाढलेली बेसुमार लोकसंख्या, त्यामुळे ढासळलेले पर्यावरणाचे संतुलन आणि त्यातून  आजार  उद्भवू लागले आहेत,पर्यावरणीय असंतुलनाचा माणसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून याचा पद्धतशीर आणि योग्य पद्धतीने अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे,

           भूतलावरील प्रत्येक सजीवासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. त्याची राखण झालीच पाहिजे. दुष्काळी भागांत तर ही बाब प्रकर्षांने जाणवते. त्यासाठी जल कार्यकर्त्यांची मोठय़ा प्रमाणात गरज आहे. मनुष्यकेंद्रीत पाण्याच्या नियोजनाची गरजही मोठी आहे.

          जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण या सर्वांनी आपल्या आणि आमच्या फुलांसारख्या मुलांच्या आरोग्यास त्रास दिला आहे. हंगामात होणारे बदल,  वितळणारे हिमशैल व कार्बन डाय ऑक्साईडचे  वाढते प्रमाण. त्सुनामी, पूर, दुष्काळ, जास्त पाऊस किंवा दुष्काळाचे दुष्परिणाम लक्षात घेता '5 जून' हा दिवस उद्याच्या उत्तम काळासाठी जगभरात 'पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जात आहे.