Wednesday, 29 July 2020

29 जुलै जागतिक व्याघ्र दिन


                   29 जुलै जागतिक व्याघ्र दिन
                       World Tiger Day




                 जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.

✏️उद्देश:-

          या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे १,००,००० वाघ होते, सध्या ही सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत.

✏️कार्यक्रम:-

सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात.

✏️मूळ संकल्पना व सुरुवात:-

                   भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या अत्यंत रोडावली आहे. गेल्या शतकात माणसाने वाघांची अनिर्बंध शिकार केलीच; शिवाय जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्रही कमी केले; परिणामी, अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले आणि माणूस- वाघ संबंध आणखीच बिघडले. नामशेष होण्याच्या जवळपास पोहचलेला वाघ जतन करण्याची आवश्यकता यामुळेच निर्माण झाली आहे. वाघाची शिकार ही माणसाची मर्दुमकी या गैरसमजामुळे सुमारे ९७ टक्के वाघांची शिकार झाली आणि आज जेमतेम ४,००० वाघ भारतात शिल्लक राहीले आहेत.

✏️अधिक माहिती:-

           वाघाचे दुर्दैव असे की, त्याला भरपूर जागा लागते ! शेती, अतिक्रमण आणि जंगलतोडीमुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र सर्वच देशांत कमी होत गेले. बदलत्या हवामानाचा फटका वाघांनाही बसत आहे. उदा. भारत आणि बांगलादेशाच्या किना-यावरच्या सुंदरबन पाणथळीत खूप वाघ आहेत. परंतु, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे येत्या ३० वर्षातच त्यांना अक्षरश: बेघर व्हावे लागणार आहे. अद्याप वाघांची चोरटी शिकार आणि तस्करी होतच आहे. सामान्य माणूस आणि वाघ यांच्यामधील दरी कमी होणे आवश्यक आहे.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका 

No comments:

Post a Comment